नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भेट घेतली आहे. नितीशकुमार यांनी भाजपची साथ सोडल्यानंतर ते पहिल्यांदा दिल्लीच्या दौऱ्यावर आले आहेत. या दिल्ली दौऱ्यात नितीशकुमार यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी, डाव्या पक्षांचे नेते सिताराम येचुरी, नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात शरद पवार आणि नितीशकुमार यांच्यात चर्चा झाल्याच्या चर्चा आहेत. नितीशकुमार यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांची एकजूट करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
नितीशकुमार यांनी नुकतीच भाजपची साथ सोडल्यानंतर त्यांनी नवी दिल्लीत विविध नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. नितीशकुमार यांच्या भेटींमधील चर्चा समोर आली नसली तरी या भेटी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात असू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या एकजुटीचा सूत्रधार कोण असेल असा प्रश्न निर्माण झाला आहे. ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, के.चंद्रशेखर राव आणि काँग्रेसने देखील विरोधकांच्या एकजुटीसाठी प्रयत्न केला होता. अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी आणि के. चंद्रशेखर यांच्या नावाला काँग्रेसकडून सहमती शक्य नाही. नितीशकुमारांनी विरोधकांची एकजूट करण्याची जबाबदारी घेतल्याचे म्हटले आहे. नितीशकुमार यांनी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी, जेडीएसचे कुमारस्वामी, नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, भाकपचे नेते सीताराम येचुरी यांची भेट घेतली आहे.