नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात शिवसेना आणि काँग्रेसला साथीला घेऊन तीन पक्षांचे सरकार स्थापन करण्याचा नवा प्रयोग यशस्वी करणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आता यूपीएच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्याचा नवा प्रस्ताव समोर आला आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी हा प्रस्ताव मांडल्याचे वृत्त आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांच्याऐवजी शरद पवार हे ‘यूपीए’चे नवे सेनापती होऊन त्यांच्या अध्यक्षतेखाली २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणीत ‘एनडीए’ला जोरदार टक्कर देण्याचा प्रयत्न सर्व विरोधी पक्षांनी करावा, हा त्यामागील उद्देश आहे.

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी निवृत्त होणार आहेत. त्यांच्या पदाची सगळी सूत्रे शरद पवार यांच्या हाती दिली जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. शरद पवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रासारखी महाविकास आघाडी राष्ट्रीय पातळीवर करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे याबाबत काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रस्ताव शरद पवार यांना दिल्याची माहिती मिळाली आहे. विरोधी पक्षाला एकत्र करुन आगामी लोकसभा निवडणुकीचं शरद पवार यांनी नेतृत्त्व करावं, असं काँग्रेसनं प्रस्तावात म्हटलं आहे. या चर्चेनं देशातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.