नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाजप नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी आज (मंगळवार) भेट घेतली. शेलार यांनी अचानकपणे पवारांची तेही दिल्लीत भेट घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याभेटीवर  उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. आशिष शेलार यांनी शरद पवार यांच्या दिल्लीतील ६ जनपथ या निवासस्थानी भेट घेऊन अर्ध्या तास मराठा आरक्षणावर चर्चा केली.

मराठा आरक्षण प्रकरणी मराठा तरुणांच्या भावना शरद पवारांना माहिती आहेत. या भावना अतिशय तीव्र आहेत. सुप्रीम कोर्टात मराठा आऱक्षणाची बाजू मांडताना या विषयाचं गांभीर्यही शरद पवारांना माहिती असल्याचे शेलार यांनी भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. पुढे ते म्हणाले की, राज्य सरकारने मराठा आरक्षणावरील आपली भूमिका स्पष्ट करावी, तसेच आरक्षणाविषयी तातडीने योग्य कायदेशीर पावले लगेच उचलावीत याबद्दल सुद्धा शरद पवारांसोबत चर्चा केल्याचे शेलार यांनी सांगितले.