‘त्या’मुळेच पूजाचे आई-वडील गप्प… : शांताबाई राठोड यांचा खळबळजनक आरोप

0
92

पुणे (प्रतिनिधी) : वनमंत्री संजय राठोड यांनी पूजा चव्हाण हिच्या आईवडिलांना पाच कोटी दिले आहेत. त्यांनी पूजाच्या हत्येविषयी काहीच बोलायचे आणि राठोड यांच्याविरुद्ध कोणतीच तक्रार करायची नाही, असे ठरवले असल्याचा खळबळजनक आरोप पूजाची चुलतआजी शांताबाई राठोड यांनी केला आहे. शांताबाई राठोड आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी आज (सोमवार) यांनी पोलीस आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर प्रसारमाध्यमांसमोर राठोड यांनी आपली भूमिका मांडली.

राठोड यांनी सांगितले की, पूजा चव्हाणच्या मृत्यूप्रकरणी तिचे आई-वडील अद्यापही काही बोलत नाहीयेत. त्या दोघांना संजय राठोड यांच्याकडून पाच कोटी रुपये देण्यात आले असून त्याबाबतचे पुरावे माझ्याकडे आहेत. योग्यवेळी ते पुरावे समोर आणणार आहे. मी या प्रकरणी सतत भूमिका मांडत असल्याने माझ्या जिवालाही धोका आहे. त्याचप्रमाणे मंत्री राठोड यांनी जरी राजीनामा दिला असला तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणी लक्ष घालावे आणि गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.