कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी कार्यालय चांगल्या पद्धतीने चालवण्याचे कसब निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांच्यामध्ये होते, असे गौरवोद्गार काढून महसूल विभागात उत्कृष्ट काम करुन प्रशासनाची प्रतिमा उंचावण्यात शंकरराव जाधव यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. पुढील काळात त्यांची निश्चितच उणीव भासत राहील, असे भावनिक उद्गार जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काढले.

निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांच्या सेवा निवृत्तीनिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने सदिच्छा समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. शंकरराव जाधव यांचा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराजांचा पूर्णाकृती पुतळा भेट देऊन सपत्निक सत्कार करण्यात आला. जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, महसूल विभागासह विविध विभागांचे अधिकारी, जाधव यांच्या पत्नी अनिता जाधव यांच्यासह कुटुंबीय व महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, प्रशासनात अभ्यासू व कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची सोबत असेल तर निश्चितच नागरिकांना गतीने सेवा उपलब्ध करुन देता येतात, याची प्रचिती शंकरराव जाधव यांच्या कामातून दिसून आली. सेवा निवृत्त होत असताना देखील कामाबद्दल असणारी आस्था, पारदर्शकता, कर्तव्यपरायणता हे त्यांच्यातील गुण सर्वांनी आत्मसात करुन कामाप्रती सकारात्मक योगदान देणे गरजेचे आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण म्हणाले, जाधव यांनी आजवर निस्वार्थी भावनेने शासनाची सेवा करुन माणसांप्रती भावनिक नाते जपले. आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी समन्वय ठेवून कर्मचारी व जिल्हाधिकारी यांच्यातील दुवा म्हणून केलेले काम वाखाणण्याजोगे आहे.

पारदर्शी पद्धतीने काम करा. लोकांच्या समस्या आपल्या समजून त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करा. आपल्या कामातून माणसे जोडा. कुटुंबाकडे लक्ष द्या. सकारात्मक राहा. प्रकरणांचा अभ्यास करुन कामे गतीने मार्गी लावा, असा संदेश जाधव यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना मनोगतातून दिला. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची झोकून देऊन काम करण्याची पद्धत, पारदर्शीपणा, त्यांनी माझ्या कामावर दाखविलेला विश्वास, काम करताना दिलेली मोकळीक यामुळेच मला चांगले काम करता आले, असेही जाधव म्हणाले.