कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापुरात तक्रारदाराच्या वादातील इनोव्हा गाडी परत मिळवून देण्यासाठी १५ हजार लाचेची मागणी करुन तात्काळ १० हजार स्विकारले आणि उर्वरित ५ हजारांची लाच स्विकारताना शाहुपूरी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईकला रंगेहात पकडण्यात आले. सागर इराप्पा कोळी (वय ४३, रा. उचगाव ता. करवीर) असे कारवाई करण्यात आलेल्या संशयित पोलीस नाईकांचे नाव आहे. अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी  दिली. सदर कारवाईमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, कोळी याला न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, तक्रारदारांचा जुन्या गाड्यांचा खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. नितीन कदम यांची तक्रारदाराने इनोव्हा गाडी वापरण्यास आणली होती. दरम्यान माकडवाला वसाहतीमधील काही लोकांनी नितीन कदम आमचे पैसे देणे आहे, असे सांगून जबरदस्तीने तक्रारदारांकडून इनोव्हा गाडी घेवून गेले. त्यामुळे तक्रारदार याबाबत शाहुपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यास गेले असता पोलीस नाईक सागर कोळी यांनी वाद मिटवून तक्रारदारास गाडी परत देण्यास सांगितले.

तसेच तक्रारदाराकडे कोळी यांनी वादातीत इनोव्हा गाडी परत मिळवून देण्यासाठी १५ हजारांच्या लाचेची मागणी केली. आणि तात्काळ १० हजार रुपये तक्रारदारांकडून घेतले. दरम्यान, उर्वरित ५ हजार रुपये घेवून येण्यास सांगितले. त्यामुळे तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणात पोलीस नाईक कोळी यांनी पाच हजारांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने मंगळवारी रात्री शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या परिसरात सापळा लावून पाच हजारांची लाच स्विकारताना कोळी यांनी पोलिसांनी रंगेहाथ जेरबंद केलं. दरम्यान, सागर कोळी याला दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर उपअधिक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश मोरे, सहायक फौजदार संजीव बम्बर्गेकर,कॉन्स्टेबल अजय चव्हाण, कृष्णात पाटील, रुपेश माने यांनी केलीयं.