कोल्हापूर (प्रतिनिधी) : वाद्यांच्या गजरात आणि विद्युत रोषणाईच्या वातावरणात शाहूपुरी बॉईज मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली. यावेळी देवीचा आगमन सोहळा महिलांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या सोहळ्याचे उद्घाटन आ. जयश्री जाधव, शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक श्वेता पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला.

या कार्यक्रमाच्या आयोजिका पूनम राकेश काटे असून दरवर्षी हा नवरात्र उत्सव साजरा केला जातो. या नऊ दिवसात भरगच्च कार्यक्रम असणार आहेत. यामध्ये रास दांडिया, श्रीसूक्त पठण, कुंकूमार्चन सोहळा, नवचंडी महायज्ञ सोहळा, माता पायपूजन सोहळा, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, महिला मुलींसाठी दांडिया स्पर्धा, लहान मुलामुलींसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा, दररोज रात्री साडे आठ वाजता आरती आणि राष्ट्रगीत असणार आहेत. तसेच स्पोर्ट गेम्स आणि रोज लकी ड्रॉमध्ये मानाची साडी आणि उल्लेखनीय सहभागासाठी हॉटेलचे फॅमिली पास मिळवण्याचा मान महिलांना मिळणार आहे. लकी ड्रॉमधील विजेत्याला दोन व्यक्तींसाठी कोल्हापूर ते तिरुपती विमान तिकीट मोफत मिळण्याची संधी उपलब्ध असणार आहे.

तरी सर्वात मोठा नवरात्र उत्सव साजरा करणारे शाहूपुरी बॉईज क्रीडा मंडळ हे एकमेव मंडळ असून या उत्सवामध्ये सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

यावेळी कीर्ती खाडे, स्वाती चोरगे, पूजा आरेकर, अर्चना मेढे, सुजाता नलवडे, ललिता शिंदे आदी उपस्थित होते.