कागल (प्रतिनिधी) : ऊस उत्पादनात वाढीच्या दृष्टीने क्षारपड जमीनीचा पोत सुधारण्यासाठी दत्त-शिरोळ पॅटर्न प्रमाणे येथील शाहू साखर कारखाना शेतकऱ्यांना पाठबळ देईल. असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले. कागल तालुक्यातील करनूर येथे शेतकऱ्यांनी क्षारपड जमीन सुधारण्यासाठी सामूहिकपणे राबवलेल्या भूमिगत सच्छिद्र पाईप निचरा चरीच्या उपक्रमाच्या पाहणीवेळी ते बोलत होते.

येथील सहा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन क्षारपड झालेली पंधरा एकर जमीन सुधारण्यासाठी सुमारे पंधरा लाख रुपये खर्चाचा शाहू साखर कारखान्याच्या प्रोत्साहनातून हा उपक्रम राबविला आहे.

समरजितसिंह घाटगे म्हणाले,  शिरोळ परिसरात क्षारपड जमिनी मोठ्या प्रमाणात झाल्या आहेत. त्या सुधारण्यासाठी या कारखान्याने धडक मोहीम राबवून जमीन सुधारणा कार्यक्रम यशस्वी केला आहे. यामुळे उत्पादनात वाढ झाली आहे. त्याच धर्तीवर शाहू साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात असा उपक्रम राबवणा-या शेतकऱ्यांच्या पाठीशी कारखाना ठामपणे राहील. त्यासाठी प्रसंगी शासनाच्या अनुदाना व्यतिरिक्त कारखान्याच्या माध्यमातून सुद्धा अनुदान देण्याचा विचार करणार असल्याचे सांगितले.

यावेळी प्रकल्प अभियंता के. डी. मरजे, माजी उपनगराध्यक्ष मनोहर पाटील, शेती अधिकारी रमेश गंगाई, ऊस विकास अधिकारी के. बी. पाटील, दिलीप घोरपडे, नारायण गुरव यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.