ग्राहकांसाठी शाहू मिल्क ॲप लाँच करणार : नवोदित घाटगे

शाहू दूध संघाच्या वार्षिक सभेत घोषणा

0
114

कागल (प्रतिनिधी) : दूध व्यवसायात मोठी स्पर्धा आहे. उच्च दर्जा व गुणवत्तेच्या जोरावर शाहू दूध संघाने शाहू ब्रँड म्हणून स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी लवकरच शाहू मिल्क ॲप लाँच करण्यात येणार आहे, अशी घोषणा शाहू मिल्क अँड अॅग्रो प्रोड्यूसर कंपनीच्या कार्यकारी संचालिका सौ. नवोदिता घाटगे यांनी केली. कागल येथील श्रीराम मंदिर सभागृहात पार पडलेल्या शाहू दूध संघाच्या १३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये त्या बोलत होत्या.

सौ. घाटगे म्हणाल्या की, शाहू दूध संघाचे १९ प्रकारचे दुग्धजन्य पदार्थ ७३ वेगवेगळ्या पॅकिंग साईजमध्ये उपलब्ध आहेत. शाहू अॅग्रो या वेबसाईटद्वारे वर्षभर ऑनलाईन विक्री सुरू असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी शाहू मिल्क हे ॲप लवकरच लाँच करण्यात येणार आहे.

चेअरमन समरजितसिंह घाटगे म्हणाले की, दूध संघाच्या माध्यमातून दुधाबरोबर उपउत्पादनांच्या निर्मितीवर भर देण्यात येणार आहे. लवकरच बेकरी उत्पादने तयार करण्याचा मानस आहे. विषय पत्रिकेचे वाचन व्यवस्थापक मानसिंग बोरगे यांनी केले. सभासदांनी सर्व विषय आवाजी मतांनी मंजूर केले. या सभेस सर्व संचालक, सुनीलराज सूर्यवंशी, संघाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

संजय पाटील यांनी स्वागत, युवराज पसारे यांनी आभार मानले.