कागल (प्रतिनिधी) : येथील शाहू साखर कारखान्याने आपल्या इतिहासात उच्चांकी ऊस गाळपाचा टप्पा पार केला. सध्याच्या २०२०-२१ हंगामामध्ये ११२ व्या दिवशी ८ लाख २० हजार मे. टन गाळप करून कारखान्याने २०१९-२० हंगामामधील ८ लाख १७ हजार मे.  टन गळीताचा उच्चांक मोडला असल्याची माहिती कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी पत्रकाद्वारे दिली.  

पत्रकात म्हटले आहे की, कारखान्याचा ४२ वा गळीत हंगाम सुरू आहे. स्व. विक्रमसिंहराजे  घाटगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली १९८० साली या साखर कारखान्याने पहिला गळीत हंगाम घेतला. प्रतिदिनी १२५० मे. टन गाळप क्षमतेने सुरू झालेल्या या कारखान्याने टप्याटप्याने विस्तारीकरण करून सध्या प्रतिदिनी ८ हजार मे. टनाने गाळप सुरू  आहे.

आज हंगामाच्या एकशे बाराव्या दिवशी स्वतःचा उच्चांकी ऊस गाळपाचा टप्पा पार करून आठ लाख 20 हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले. या हंगामासाठी व्यवस्थापनाने १० लाख टन गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. मार्चअखेर हंगाम चालेल असा अंदाज आहे. सभासद, शेतकरी यांच्या सहकार्याने निश्चित केलेले उद्दिष्ट  निश्चितपणे पार करू, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.