कागल (प्रतिनिधी) : गळीत हंगाम २०२०-२१ साठी शाहू साखर कारखान्याने १० लाख मेट्रिक टन  उस गाळपाचे  उद्दिष्ट निश्चित केले आहे. तसेच डिस्टीलरीतून १ कोटी ३० लाख लिटर स्पिरीट,९० लाख लिटर्स इथेनॉल उत्पादनाचे व सहवीज निर्मिती प्रकल्पातून ८ कोटी २० लाख युनिट्स वीज निर्मितीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. अशी माहिती शाहू साखर कारखान्याचे चेअरमन समरजितसिंह घाटगे यांनी दिली. कारखान्याचा ४१ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन चेअरमन समरजितसिंह घाटगे व त्यांच्या पत्नी सौ.नवोदिता घाटगे यांच्या हस्ते करण्यात आला. 

कोविडच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच सभासद, ऊस उत्पादक, शेतकरी, हितचिंतक आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने हा सोहळा संपन्न झाला. यावेळी कारखाना कार्यस्थळावर उभारलेल्या कोविड केअर सेंटरचेही उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.

समरजितसिंह घाटगे म्हणाले की,  या हंगामासाठी कारखाना कार्यक्षेत्रातून ९ हजार ८५० हेक्टर व गेटकेन मधून ६ हजार ३७० हेक्‍टर अशी एकूण १६ हजार २२० हेक्टर ऊसाची नोंद झालेली आहे. तरी ऊस उत्पादकांनी, सभासदांनी,  आपला नोंदवलेला  संपूर्ण ऊस कारखान्याकडे गळीतास पाठवून उद्दिष्टपुर्तीसाठी सहकार्य करावे. असे आवाहनही त्यांनी केले.

तसेच या हंगामासाठी कोविड महामारीची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे परभागातून येणाऱ्या तोडणी मजुरांची व सुरक्षितता लक्षात घेऊन कारखाना कार्यस्थळावर २५ बेडचे सुसज्ज कोविडसेंटर उभारले आहे.  त्याचे उद्घाटन आज झाले आहे. या कोविड सेंटरमध्ये लक्षणे नसलेले  रुग्ण, ऑक्सिजन बेड आणि हायफ्लो ऑक्सिजन बेड अशा तीन पद्धतीने  उपचार केले जाणार आहेत. त्यासाठी तज्ञ डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तसेच आवश्यक त्या सर्व  वैद्यकीय साहित्य सामग्री वैद्यकीय सुविधा उपलब्ध केल्याचे घाटगे यांनी सांगितले.

कार्यक्रमास शाहू ग्रूपच्या मार्गदर्शिका व संचालिका श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे ,कर्नाटकचे माजी उर्जा राज्यमंत्री व कारखान्याचे ज्येष्ठ संचालक वीरकुमार पाटील, व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे, सर्व संचालक,कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, सभासद, शेतकरी, अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.