कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील श्री शाहू मिलच्या जागेवर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कार्यातील पहिले पाऊल म्हणता येईल असा निर्णय वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने शासनाने घेतला असून, कोल्हापूर शहरवासीयांच्या जिव्हाळ्याचा असणारा शाहू मिलचा भोंगा पुन्हा एकदा कोल्हापूरांना ऐकू येणार आहे. या निर्णयाबद्दल भाजपाच्या वतीने शाहू मिलच्या दारात साखर-पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

याप्रसंगी महेश जाधव, विजय जाधव, बाबा इंदूलकर, कवाळे यांनी मनोगतामध्ये भोंग्यापासून होणारी सुरवात ही चांगल्या कामाची नांदी आहे. याबाबत सकारात्मक पाऊल उचलणारे वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले. येत्या नजीकच्या काळात शाहू मिल दिमाखात सुरु होईल, असे सांगत केंद्र सरकारच्या माध्यमातून आय.आय.टी सारख्या मोठ्या संस्था याठिकाणी येण्यासाठी, त्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

शाहू महाराजांचे नाव घेऊन ज्यांनी सत्ता भोगली त्यांनी कधी याविषयात विचार करून पुढाकार घेतला नाही. यापुढील काळात मिलच्या जागेमध्ये स्मारक उभा न करता तरुणांना रोजगार उपलब्ध करून स्वत:च्या पायावर उभे करायचे हे शाहू महाराजांचे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी सर्वांनी एकत्रित राहून मिलच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी सांगितले.

यावेळी दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, राजू मोरे, विजय आगरवाल, सुनीलसिंह चव्हाण, अभिजित शिंदे, आजम जमादार, राजाराम परीट, सयाजी आळवेकर, गिरीश साळोखे, नजीम आत्तार, शाहरुख गडवाले, दिलीप बोंद्रे, अनिल कामत, विश्वजित पोवार, अक्षय मोरे, हर्षवर्धन पाटील, अरविंद वडगांवकर, विनय रंगलानी व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.