इचलकरंजी (प्रतिनिधी) : शहापूरचे ग्रामदैवत व पंचक्रोशीतील नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री म्हसोबा देवाची यात्रा पोलिस प्रशासनाच्या सूचनेनुसार भाविकांसाठी रद्द करण्यात आली आहे. यात्रेच्या मुख्य दिवशी म्हणजे २० एप्रिल रोजी मोजक्याच लोकांच्या आणि पुजाऱ्यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी करण्यात येणार आहेत. कोरोना महामारी व वाढती रुग्णसंख्या या सर्व गोष्टींचा विचार करून शहापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यादव व उदयसिंग पाटील (बांधकाम सभापती) यांनी म्हसोबा मंदिरात आयोजित केलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीमध्ये म्हसोबाची मानाची सासनकाठी जागेवरच उभी करण्यात येईल. लक्ष्मी मंदिर, शहापूर येथे विधिवत पालखीचे जागेवर पूजा करण्यात येईल. तसेच म्हसोबा देवस्थान येथे विधिवत सोमवारी रात्री बारा वाजता अभिषेक प्रमुख पुजारी यांची उपस्थित करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना सासनकाठी, पालखी, अभिषेक, दर्शन, काही करता येणार नाही, अशा सक्त सूचना बैठकीमध्ये करण्यात आल्या. यात्रेदिवशी आपापल्या घरातूनच नैवेद्य दाखवावा. मंदिराकडे येऊ नये, अन्यथा कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. नागरिकांनी व गावकऱ्यांनी पोलीस प्रशासनाच्या सूचना मान्य केल्या.

सदर बैठकीत प्रसंगी नगरसेवक किसन शिंदे, भाऊसाहेब आवळे (शिक्षण सभापती), नितीन कोकणे, प्रधानजी माळी, दादासाहेब भाटले, रविंद्र कांबळे, रणजीत अनुसे, पोलीस पाटील विलास कांबळे, दिलीप पाटील, रमेश पाटील, दशरथ कांबळे, सुनील कांबळे, आप्पासाहेब कांबळे यासह पोलीस प्रशासन, सामाजिक कार्यकर्ते, म्हसोबा देवस्थानचे प्रमुख मान्यवर, नागरिक व पुजारी उपस्थित होते.