शहापूर पोलिसांनी अवघ्या काही तासांत घेतला हरवलेल्या चिमुकलीचा शोध…

0
58

इचलकरंजी (प्रतिनिधी) : शहापूर येथील चिंतामणी कॉलनी गल्ली क्रमांक १० मध्ये राहणारी अंजली कृपाशंकर सिंह (वय ६)  ही चिमुकली अचानक बेपत्ता झाली होती. यामुळे खळबळ उडाली होती. मात्र, शहापूर पोलिसांनी अवघ्या काही तासांत तिला शोधून काढून तिला पालकांच्या ताब्यात दिले. याबद्दल पोलिसांचे अभिनंदन होत आहे.

शहापूर येथील बाबासाहेब देसाई यांच्या घरी कृपाशंकर सिंह हे आपल्या पत्नी व मुली सह भाड्याने राहतात . आज (बुधवार) खेळत असताना ती अचानक बेपत्ता झाली. ही बाब लक्षात येताच मुलीच्या पालकांनी शहापूर पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची माहिती दिली. या महितीनंतर पोलीस उपअधीक्षक बाबुराव महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश खराडे आणि होमगार्ड त्याचबरोबर शहापूर पोलिसांचे एक पथक, स्थानिक नागरिक यांचे एक पथक अशा तीन पथकांनी मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. बेपत्ता मुलीचा फोटो दाखवत व मिळालेल्या माहितीनुसार तीन किलोमीटर अंतरावरील कोरोची येथे ही मुलगी सापडली. पोलिसांच्या या तत्परतेबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.