पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा-पावनगडला जोडणाऱ्या रस्त्यावर सततच्या जोरदार पावसामुळे शाडूचा भराव कोसळल्यामुळे  पावनगड-पन्हाळा वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. हा भराव दोन अडीचच्या दरम्यान कोसळला असावा, असे फिरावयास गेलेल्या सुशांत पन्हाळकर यांच्या निदर्शनास आली. त्यांनी ही माहिती ‘लाईव्ह मराठी’च्या प्रतिनिधीस दिली.

पावनगडावरील ग्रामस्थांना पन्हाळा, कोल्हापूर या ठिकाणी ये-जा करण्यासाठी हा एकमेव पर्यायी रस्ता आहे. भराव कोसळल्यामुळे वाहने आणि लोकांना ये-जा करण्यासाठी अडथळा निर्माण झाला आहे. हा मार्ग वनविभागाच्या हद्दीमध्ये येत असल्यामुळे रस्त्याच्या डांबरीकरणासाठी मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे पन्हाळ्यावरून पावनगडला जाण्यासाठी लोकांना चिखलामधून मोठी कसरत करावी लागत आहे.  मुख्यमार्गावर भराव कोसळल्यामुळे गडावरील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाने लवकरात लवकर हा भराव काढून हा मार्ग खुला करावा, अशी मागणी पावनगड येथील अंजुम मुजावर यांनी केली आहे.