आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेत पुन्हा सावळा गोंधळ..?

0
152

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागात आणि संवर्गातील तब्बल 6205 पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. पण ही भरती प्रक्रिया राबवणाऱ्या यंत्रणेच्या चुकीच्या  कारभाराचा फटका नोकरीसाठी धडपडणाऱ्या  युवकांना बसत आहे. 24 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या वाहन चालक पदासाठीच्या कोल्हापुरातील एका उमेदवारास चक्क दोन हॉलतिकिटे पाठवण्यात आली आहेत. दोन्ही हॉल तिकीटे  पुणे येथील वेगवेगळ्या परिक्षा केंद्रावरील आहेत. त्यामुळे  हा उमेदवार नेमके कोणत्या परीक्षा केंद्रावर परीक्षा द्यायची या संभ्रमात आहे. असे प्रकार आणखी काही उमेदवारांच्याबाबतीत झाले असण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. या प्रकारामुळे या भरतामधील सावळा गोंधळ समोर आला आहे.

केवळ भरती प्रक्रिया राबवणाऱ्या खाजगी कंपनीच्या गोंधळामुळे या परीक्षा रद्द करण्याची नामुष्की यापूर्वी येऊनही याबाबत शासनाला मात्र शहाणपण आलेले दिसत नसल्याचे आता उमेदवार बोलत आहे. एकूण 2139 ‘वर्ग आणि 3460 ‘‘  वर्ग अशी एकूण 6205 पदे भरली जाणार आहेत. क वर्गातील पदासाठी  24 ऑक्टोबर रोजी आणि ड वर्गातील पदासाठी  31 ऑक्‍टोबर रोजी  परीक्षा घेण्यात येणार आहेत. राज्यातील 1500 परीक्षा केंद्रावर एकाच वेळी होणाऱ्या या परीक्षेसाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या सूचनेनुसार 9 दिवस आधी हॉलतिकिटे उमेदवारांना पाठविण्यात आली आहेत. पण हॉलतिकीटे पोहच होताच भरती प्रक्रिया राबवणाऱ्या कंपनीचा अर्धवट कारभार उघड होत आहे.  त्याचा फटका काही उमेदवारांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कोल्हापुरातील एका उमेदवाराने वाहनचालक पदासाठी अर्ज केला आहे. त्याला 24 ऑक्टोबर च्या परीक्षेसाठी हॉलतिकीट पाठवण्यात आले. पण ती एक नव्हे तर दोन तिकिटे पाठविली आहेत. तेही पुणे येथील वेगवेगळ्या परीक्षा केंद्राची आहेत. आता यातील कोणत्या परीक्षा केंद्रावर परीक्षा द्यायची या संभ्रमात हा उमेदवार आहे. या उमेदवारांने आपली दोन्ही हॉल तिकीटे  लाईव्ह मराठीकडे दिली आहेत.

आता याबाबत राज्य शासनाच्या आरोग्य विभाग आणि भरती प्रक्रिया  राबवणारी संबंधित कंपनी काय निर्णय घेणार पूर्णपणे निर्दोष, पारदर्शक आणि सुरळीत ही भरती प्रक्रिया पार पडणार का ? याबाबत पुन्हा प्रश्न निर्माण झाले आहेत.