कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात कोरोना आणि पूरकाळात आघाडीवर काम करणाऱ्या पत्रकारांसाठी आज (शनिवार) आरोग्य तपासणी शिबिर पार पडले. कोल्हापूर प्रेस क्लब, कोल्हापूर आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन (मुंबई) यांच्या विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तज्ज्ञ डॉक्टरांनी पत्रकारांची आरोग्य तपासणी करून आवश्यक औषधे दिली. यावेळी पत्रकारांना फाउंडेशनच्या वतीने प्रथमोपचार कीट देण्यात आले.

दुपारी बारा वाजता शिबिराला सुरुवात झाली. या शिबिरात हृदयविकार, मधुमेह यासह अन्य आजारांची तपासणी करण्यात आली. तसेच आवश्यक औषधे देण्यात आली. यावेळी सर्व पत्रकारांना धनुर्वाताचे इंजेक्शन देण्यात आले. थंडी,  ताप,  डोकेदुखी, खोकल्यासह सी व्हिटॅमिन आणि कॅल्शिअमच्या गोळ्याही देण्यात आल्या. डॉ. शिंदे फाऊंडेशनचे डॉ. जे. बी. भोर आणि त्यांच्या टीमने आरोग्य तपासणी केली. समन्वयक मंगेश चिवटे यांनी शिबिराच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला. दिवसभरात सव्वाशेहून अधिक पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांनी या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी प्रेस क्लबचे उपाध्यक्ष विजय केसरकर, कार्याध्यक्ष उद्धव गोडसे, पदाधिकारी, संचालकांसह पत्रकार उपस्थित होते.