कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजर्षी शाहू महाराजांच्या उपस्थितीत पायाभरणी झालेल्या सेवा रुग्णालयाला अद्ययावत उपकरणांची गरज आहे.  हे रुग्णालय खासगी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल्सच्या तोडीचे बनवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन आ. चंद्रकांत जाधव यांनी दिले. ते बावडा येथील सेवा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संवादावेळी बोलत होते.

आ. जाधव म्हणाले की, कोरोनाकाळात सीपीआर दवाखाना हा कोव्हिड रुग्णांसाठी राखीव ठेवल्याने, जिल्ह्याचा आरोग्य सेवेचा भार सेवा रुग्णालयावर आला. या काळात सेवा रुग्णालयात ४० बेडची व्यवस्था असतानाही येथे ७० बेडची व्यवस्था करून रुग्णांवर उपचार करण्यात आले, ही बाब कौतुकास्पद आहे. रुग्णालयातील बेडची संख्या वाढवण्याचा प्रस्ताव द्या, तसेच रूग्णालय अद्ययावत करण्यासाठी आवश्यक उपकरणाची मागणी करा, सरकारकडून त्याची मंजूरी आणणार असल्याचे आ. जाधव यांनी सांगितले. यावेळी रुग्णालयाची अंतर्गत आणि बाह्य स्वच्छता, जैववैद्यकीय घनकचरा व्यवस्थापन, रुग्णांची काळजी, वैयक्तिक स्वच्छता,अद्ययावत उपकरणांची माहिती आ. जाधव यांनी घेतली.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक अनिल माळी, सेवा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. उमेश कदम, डॉ. दिलीप वाडकर, डॉ. प्रविण नाईक, डॉ. प्रशांत इंगवले, संपत चव्हाण आदी उपस्थित होते.