सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला भीषण आग (व्हिडिओ)

0
215

पुणे (प्रतिनिधी) : पुण्यात कोरोना लसीची निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आज (गुरुवार) दुपारी दोनच्या सुमारास आग लागली. त्यानंतर परिसरात धुराचे मोठे लोट पसरले आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पुण्यातील मांजरा परिसरात सीरम इन्स्टिट्यूटची नवीन इमारत आहे. या इमारतीत बीसीजी लसीचे उत्पादन करण्यात येते. आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

 

आज दुपारी दोन वाजून ३७ मिनिटांनी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना आगीची माहिती मिळाली. जवानांकडून तिघा कामगारांची आतापर्यंत सुटका करण्यात आली आहे. सुदैवाने कुठल्याही जीवितहानीचं वृत्त नाही. ज्या बिल्डिंगला आग लागली त्या इमारतीत बीसीजी लस बनवण्याचं काम चालतं. मात्र या इमारतीत मोठ्या प्रमाणात साठा नव्हता. त्यामुळे मोठं नुकसान झालेलं नाही, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.

पुण्याच्या माजी महापौर आणि भाजप आमदार मुक्ता टिळक यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. दीडच्या सुमारास आग लागल्याची माहिती आहे. कोव्हिड लसीच्या इमारतीला आग लागलेली नाही, त्यामुळे लस सुरक्षित आहे. जीवितहानी नाही. ज्या ठिकाणी आग लागलीय, त्या परिसरात कोरोना लस बनवण्याचं काम सुरु आहे. हा घातपाताचा प्रकार असल्याची मला शंका आहे असे त्यांनी म्हटले आहे.