मुंबई (प्रतिनिधी) : मराठी, हिंदीसह दक्षिण चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे मराठमोळे अभिनेते म्हणजे सयाजी शिंदे हे नेहमी चर्चेत असतात. यावेळी त्यांचे चर्चेत येण्याचे कारण मात्र गंभीर आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर चित्रपट निर्मात्याने फसवणुकीचे आरोप केले आहेत.

अभिनेते सयाजी शिंदे यांनी चित्रपटात काम करतो असे सांगून ५ लाख रुपये घेतल्यानंतरही चित्रपटात काम न करता दिलेले पैसे माघारी न दिल्याचा आरोप चित्रपटाचे निर्माते सचिन ससाने यांनी केला आहे. यासंदर्भात निर्माते सचिन ससाने यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळात याविषयी तक्रार दाखल केली आहे.