सांगली (प्रतिनिधी) : कडेगाव येथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या २८ वर्षीय युवतीवर झालेल्या बलात्कारप्रकरणी संशयित आरोपी कडेगाव पोलीस ठाण्याचा पोलीस निरीक्षक विपीन हसबनीस आज (गुरूवार) सकाळी कडेगाव पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. तब्बल तीन महिन्यानंतर हसबनीस अटकेत आला आहे. हसबनीस यांनी कोल्हापूर जिल्ह्यातही काही वर्षे नोकरी केली आहे.

एमपीएससी आणि यूपीएससी स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करण्याबाबत बतावणी करून पीडित तरुणीला कडेगाव येथील बंगल्यावर आणून तिचावर बलात्कार केला असल्याची तक्रार पोलीस निरीक्षक हसबनीस यांच्याविरोधात संबंधित पीडित तरुणीने कडेगाव पोलीस ठाण्यात दिली होती. तरुणीच्या तक्रारीवरून पोलीस निरीक्षक हसबनीस याच्याविरुद्ध २८ ऑगस्ट २०२० रोजी कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, जिल्हा न्यायालयाने हसबनीस याचा अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर हसबनीस याने उच्च न्यायालयात अटकपूर्व जमीन अर्ज दाखल केला होता. हा जामीन अर्ज देखील दोन दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने फेटाळला होता. कडेगाव पोलीस ठाण्यात हसबनीस हा हजर झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास सध्या तासगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे करीत आहेत.