कोल्हापूर (प्रतिनिधी) : ज्येष्ठ नेते, विचारवंत, सामाजिक चळवळीतील अग्रणी डॉ. एन. डी. पाटील (वय ९३) यांचे आज (सोमवार) निधन झाले. प्रकृती बिघडल्याने त्यांना खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. मात्र, उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.    

त्यांचा सीटी स्कॅन करण्यात आला होता. त्यांच्या मेंदूच्या काही भागांना इन्फान्ट झाल्याने ते बेशुद्ध अवस्थेत होते. यापूर्वी त्यांच्या एक किडनीची शस्त्रक्रिया करून काढण्यात आली होती. त्यामुळे त्यांना रेनॉल फेल्यूअर आणि श्वास घेण्यास अडचण येत होती. त्यांना हायफॉक्सीया झाले होते. दरम्यान, त्यांच्याकडून उपचारास फारसा प्रतिसाद मिळत नव्हता.

ज्येष्ठ विचारवंत आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून लढाई करणारे लढवय्ये नेते प्रा. एन. डी. पाटील यांचे संपूर्ण नाव नारायण ज्ञानदेव पाटील. त्यांचा जन्म १५ जुलै १९२९ ढवळी (नागाव) जि. सांगली येथे अशिक्षित शेतकरी कुटुंबात झाला. १९५५ मध्ये त्यांनी एम.ए (अर्थशास्त्र) आणि १९६२ मध्ये एल.एल.बी. पुणे विद्यापीठातून पूर्ण केले.

१९५४ ते १९५७ या कालावधीत छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथे त्यांनी  अध्यापनाचे काम केले. तसेच ‘कमवा व शिका’ या योजनेचे प्रमुख व रेक्टर म्हणून काम पाहिले. १९६० साली कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, इस्लामपूर येथे प्राचार्यपदाची धुरा सांभाळली.