कोल्हापूर (प्रतिनिधी) : ज्येष्ठ नेते, विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या पार्थिवावर कसबा बावड्यातील स्मशानभूमीत आज (मंगळवार) दुपारी २ च्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी एन.डी. पाटील अमर रहे, अशा घोषणा देण्यात आल्या. तत्पूर्वी त्यांच्या पार्थिवावर उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री सतेज पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून श्रध्दांजली वाहिली.

पुरोगामी चळवळीतील अग्रणी, ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांचे सोमवारी (दि.१७) निधन झाले. आज सकाळी राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजमध्‍ये त्‍यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. राज्य शासनाच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी  महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार अरुण लाड, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यासह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांनी आदरांजली अर्पण केली.  पोलीस दलातर्फे त्यांना शोकप्रसंगीचे बिगूल वाजवून आणि बंदूकीच्या तीन फैरी हवेत झाडून सशस्त्र मानवंदना देण्यात आली.

यावेळी स्वर्गीय प्रा.एन. डी. पाटील यांच्या पत्नी सरोज उर्फ माई, मुलगा प्रशांत व सुहास, स्नुषा संगीता, नात रिया यांच्यासह कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुटुंबातील मोजक्याच सदस्यांच्या उपस्थितीत दिवंगत प्रा.पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.