पुणे (प्रतिनिधी)  ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि फूड ब्लॉगर आशीष चांदोरकर (वय ४४) यांचे बुधवारी पहाटे झोपेतच हृदयविकाराच्या झटक्याने पुण्यातील घरी निधन झाले. चांदोरकर अविवाहित होते. त्यांच्या पश्चात एक बहीण व कुटुंबीय असा परिवार आहे. आज संध्याकाळी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

चांदोरकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीवर आधारित ‘मॅन ऑफ मिशन महाराष्ट्र’ या पुस्तकाचे लेखन केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही टि्वटमधून चांदोरकरांना श्रद्धांजली वाहिली आहे. चांदोरकर यांना २०२० मध्ये कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी मृत्यूक्षी झुंज देतच त्यांनी कोरोनावर मात केली होती. सोशल मीडियावर सक्रिय असलेले चांदोरकर आयुष्यात भेटणाऱ्या मित्र आणि घटनांवर लिहत असत. त्यांच्या वैशिष्टपूर्ण लिखाणामुळे त्यांचा चाहता वर्गही दिवसागणिक वाढत होता.

चांदोरकर यांनी ‘सामना’तून पत्रकारितेची सुरुवात केली होती. नंतर ९ वर्षे ते महाराष्ट्र टाईम्समध्ये उपसंपादक पदावर कार्यरत होते. पुढे त्यांनी सर्वज्ञ मीडिया सर्विसेस ही संस्था सुरू केली. लवंगी मिरची हे यू-ट्यूब चॅनेलही त्यांनी सुरू केले होते. क्रीडा, राजकारण, समाजकारण, पर्यटन आणि खाद्यभ्रमंती या विषयांवर त्यांचे लिखाण प्रसिद्ध होते. मंगळवारीही त्यांनी फूडी शोचे शूटिंग केले होते. आज सकाळी त्यांच्या घराचे दार उशीरापर्यंत उघडले नसल्याचे बघून शेजाऱ्यांनी दरवाजा ठोठावला. आतून काहीच प्रतिसाद न आल्याने शेजाऱ्यांनी चांदोरकर यांच्या मित्रांना कळवले. मित्रांनी आवाज देऊनही ते उठत नसल्याने डॉक्टरांना बोलवण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने झोपेतच निधन झाल्याचे सांगितले.