नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपल्या विशिष्ट गायनशैलीसाठी प्रसिद्ध असलेले भजनसम्राट नरेंद्र चंचल यांचे निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. मागील तीन दिवसांपासून प्रकृती खालावल्यामुळे त्यांना दिल्लीमधील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज (शुक्रवार) दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे कलाविश्वामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

नरेंद्र चंचल यांच्या हिंदी फिल्म चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीची सुरुवात राजकपूर दिग्दर्शित सुपरहिट ‘बॉबी’ या चित्रपटापासून झाली. या चित्रपटातील त्यांनी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली ‘बेशक मंदिर मस्जिद तोडो’ हे गाणे गायले होते. हे गाणे खूपच गाजले. त्यानंतर त्यांनी अवतार, रोटी कपडा और मकान अनेक चित्रपटांमधील गाणी गायली आहेत. पण त्यांना ‘आशा’ या चित्रपटात गायिलेल्या ‘चलो बुलावा आया है’ या भजनाने खरी ओळख मिळवून दिली. ‘बेनाम’ या अमिताभ बच्चन अभिनित चित्रपटात त्यांनी गायिलेले ‘मैं बेनाम हो गया’ हे गाणेही हिट ठरले होते.