कोल्हापूरच्या हद्दवाढीचा फेर प्रस्ताव शासनाला त्वरित पाठवा : कृती समितीची मागणी

0
100

कोल्हापूर (प्रतिनिधी) : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी महापालिकेच्या बैठकीत शहर हद्दीवाढीचा फेर प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार नवीन प्रस्तावामध्ये ४२ गावे आणि तीन एमआयडीसींचा समावेश करुन शहराच्या हद्दवाढीचा फेर प्रस्ताव आठ दिवसात राज्य शासनाला पाठवावा. अशी मागणी आज (सोमवार) कोल्हापूर शहर हद्दवाढ समर्थक सर्व पक्षीय कृती समितीच्या वतीने आर.के.पवार, अॅड. बाबा इंदूलकर,बाबा पार्टे यांच्या नेतृत्वाखाली मनपा प्रशासन आणि कृती समितीच्या बैठकीत करण्यात आली. याबातचे निवेदन शिष्टमंडळातर्फे प्रशासक डॉ कादंबरी बलकवडे यांना देण्यात आले.

यावेळी शहराची हद्दवाढ ही गेल्या अनेक वर्षाची मागणी असून शुक्रवारी नगरविकास मंत्र्यांनी यासंदर्भात फेरप्रस्ताव सादर करण्याच्या सुचना दिल्या. मात्र याबाबत काय धोरण आहे हे महापालिका प्रशासनाने स्पष्ट करावं अशी मागणी माजी महापौर आर.के. पोवार यांनी केली. तर कोल्हापूरच्या विकासाला सर्वांचा विरोध झाला असून महापालिका पाचव्या क्रमांकावरून  तेराव्या क्रमांकावर आल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तर अॅड. बाबा इंदुलकर यांनी पुर्वीच्या प्रस्तावात सुधारणा करून ४२ गावे आणि ३ एमआयडीसींचा समावेश करून आठ दिवसात प्रस्ताव राज्य सरकारला सादर करण्याची मागणी केली.

या चर्चेत अजय कोराणे, अनिल घाटगे, किशोर घाटगे, माजी नगरसेवक माणिक मंडलिक यांच्यासह कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. दरम्यान, प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या हद्दवाढीबाबत सूचनांनुसार  कायदेशीर बाबी तपासूनच त्यावर निर्णय घेवू असे सांगितले.

यावेळी अशोक भंडारे, सुनील देसाई, दुर्गेश लिंग्रज,महादेव पाटील,अमर निंबाळकर, कोल्हापूर शहर हद्दवाढ समर्थक, सर्व पक्षीय कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.