मुंबई (प्रतिनिधी) : दिवसेंदिवस भारत देश खऱ्या अर्थाने ‘आत्मनिर्भर’ बनण्यासाठी वाटचाल करत आहे. भारतात मोबाइल प्रोडक्शन करणाऱ्या काही कंपन्या आहेत, पण मोबाइल पार्ट्स अजूनही बाहेरुनच मागवावे लागतात. ही समस्याही आता लवकरच सुटण्याची शक्यता आहे. टाटा समूहाची कंपनी टाटा सन्स आता देशातच मोबाइलचे पार्ट्स बनवण्याच्या तयारीत आहे.

भारतातच मोबाइलचे पार्ट्स बनवण्यासाठी टाटा सन्स तामिळनाडूमध्ये मोठा प्रकल्प उभारणार आहे. या योजनेत टाटा समूह तब्बल १.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. तर, टाटा समूह या योजनेसाठी १.५ अब्ज डॉलर्सचे कर्ज घेणार असल्याचेही एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

नव्या प्रकल्पासाठी कंपनी सीईओच्या शोधात असून टाटाच्या या नव्या प्रकल्पात सर्वप्रथम आयफोनचे पार्ट्स बनवले जातील असे सांगितले जात आहे. दरम्यान, भारतीय मार्केटमध्ये दर्जेदार मेड इन इंडिया स्मार्टफोन उपलब्ध नसल्याने चिनी कंपन्यांची देशात मक्तेदारी वाढली आहे. जर, भारत या क्षेत्रात आत्मनिर्भर झाला तर त्याचा देशाला फायदा होईलच सोबतच चीनलाही मोठा फटका बसेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.