कोल्हापूर (उत्तम पाटील) : स्वयंअर्थसहाय्यित शाळेतील २५% फी गेले कित्येक वर्ष कायमस्वरूपी विनाअनुदानित शाळांना मिळाली नसल्यामुळे शिक्षकांचे पगार कसे होणार याचा प्रश्न संस्थाचालकांना पडला आहे. त्यामुळे शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

आरटीई अंतर्गत स्वयंअर्थसहाय्यित २५% विद्यार्थ्यांना प्रतीपूर्ती रक्कम अदा केली जाते. पण बऱ्याच शाळांचे प्रस्ताव हे वेळेत देऊनही अजूनही जिल्हा परिषदेकडून त्यांची रक्कम दिली गेली नसल्याचे समजले. २०१७-१८/२०१८-१९ आणि २०१९-२० या वर्षातील आरटीई अंतर्गत मिळणारी प्रतिपूर्ती रक्कम ही मुदतीपूर्वी प्रस्ताव सादर करूनही मिळाली नाही. या संदर्भात जि. प. शिक्षणाधिकारी यांच्याशी माहिती घेतली असता असे कोणतेही प्रस्ताव आपल्याकडे शिल्लक नसल्याचे सांगण्यात आले. याच शिक्षण खात्यातील संबंधित विभागाच्या कर्मचारी यांना विचारले असता अनेक प्रस्ताव हे मुदतीनंतर आल्यामुळे याची अंमलबजावणी केली नाही असे सांगण्यात आले. शिक्षण अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून मिळणारी माहिती ही विसंगत असल्यामुळे यामध्ये तथ्य असल्याचे दिसून येते.

या अगोदर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी या संदर्भात सूचना दिल्या होत्या, तेव्हा काही शाळांना याची प्रतिपूर्ती रक्कम मिळाली होती. पण या व्यतिरिक्त जिल्ह्यातील बऱ्याच शाळांचे प्रस्ताव हे मुदतपूर्व वेळेत येऊनसुद्धा त्यांना ही रक्कम मिळालेली नाही, हे दिसून येते. तर याच प्रस्तावाबरोबर आलेल्या काही शाळांच्या खात्यावर रक्कम जमा झाली असल्याने दुजाभाव केल्याचा आरोप काही शिक्षण संस्थांकडून होत आहे. ‘काही शाळांच्या खात्यावर चुकून जादा रक्कम गेल्यामुळे ती परत आल्यावर तुमच्या खात्यावर जमा केला जाईल’ असे कर्मचाऱ्याकडून सांगण्यात येते. त्यामुळे अनेक शाळांमध्ये नाराजी पसरली आहे. यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मितल यांनी लक्ष घालावे, अशी मागणी शिक्षण संस्थांकडून होत आहे.