सावरवाडी (प्रतिनिधी) : चालू ऊस गळीत हंगामात साखर कारखान्यांच्या खुद ऊस तोडणी धोरणानुसार ऊस तोडण्या सुरू आहेत. त्याचा परिणाम साखर कारखान्यांच्या ऊस तोडणी पाळी पत्रकावर झाला आहे. त्यामुळे साखर कारखाना ऊस उत्पादक सभासदांचा ऊस नेणार की नाही ? असा संतप्त सवाल शेतकरी करू लागले आहेत. तर साखर कारखाना संचालकांविरोधात नाराजीचा सूर उमटू लागला आहे. 

खुद ऊस तोडण्या दिल्यामुळे खोडवा, बुडवा उसाची उचल होऊ लागली. त्यामुळे साखर उताऱ्यावर परिणाम जाणवत आहे. खुद ऊस तोडण्यामुळे ऊस तोडणी मजूर आपआपली उसाची क्षेत्र रिकामे करू लागली. बागायतदार शेतकऱ्याच्या आडसाली लागणी, भात क्षेत्रातील ऊस लागणी, आडसाली ऊस खोडवा क्षेत्र मागे राहू लागले आहेत. ज्याच्याकडे माणसे, वाहने आहेत त्या शेतकऱ्यांची उसाचे क्षेत्र रिकामे होऊ लागली आहेत. तर ऊस तोडणी पाळी पत्रकात सावळा गोंधळ उडू लागला आहे. उसाची उचल होत नसल्यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे.

ऊस गळीत हंगामात ऊस तोडणीची कामे रेंगाळली असून साखर कारखाना नोंदणीकृत ऊस क्षेत्रातील उसाची उचल होऊ शकत नाही. त्यामुळे ऊस गळीत हंगाम लांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे.