कोल्हापूर (प्रतिनिधी) : कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी व राष्ट्रीय छात्रसेनेची (एनसीसी) छात्रा वैष्णवी प्रकाश साळोखे हिची युनायटेड किंगडम येथील कॅम्पसाठी भारतीय पथकात निवड झाली आहे. या कॅम्पमध्ये देशभरातील १० कॅडेट्सची निवड झाली असून, त्यात महाराष्ट्रातून निवड झालेली वैष्णवी ही एकमेव कॅडेट आहे.
डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात द्वितीय वर्ष अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. यावर्षी २६ जानेवारी रोजी दिल्ली येथे झालेल्या प्रधानमंत्री रॅलीमध्ये ती सहभागी झाली होती. २०२३-२४ च्या ‘यूथ एक्स्चेंज प्रोग्राम’ अंतर्गत ही निवड झाली आहे. युनायटेड किंगडम येथे ५ ते १९ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या कॅम्पमध्ये ती सहभागी होणार आहे. महाविद्यालयात 2022-23 वर्षांपासून एन.सी.सी. युनिट सुरू झाले आहे. पहिल्याच वर्षी या युनिटची छात्रा वैष्णवीची प्रथम थेट राष्ट्रीय पातळीवरील रॅलीसाठी आणि त्यानंतर युनायटेड किंगडम येथील कॅम्पसाठी निवड झाली आहे.
या निवडीबद्दल वैष्णवीचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ ए.के. गुप्ता यांनी अभिनंदन केले. प्राचार्य डॉ. संतोष चेडे व रजिस्ट्रार डॉ एल. व्ही. मालदे यांचे प्रोत्साहन लाभले. डीन स्टूडेंट अफेअर्स डॉ. राजेंद्र रायकर आणि एन.सी.सी. समन्वयक डॉ. राहुल महाजन यांचे तिला मार्गदर्शन लाभले.