करवीर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील प्रगत गडमुडशिंगी ग्रामपंचायतीची ‘माझी वसुंधरा’ अभियानासाठी निवड झाली आहे. या अभियानाचा प्रारंभ  गडमुडशिंगीमधून झाला. राज्यातील २७२ ग्रामपंचायतींमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे.

अनियमित पाऊस, वादळे यांसारख्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी आणि कोरोनासारख्या महामारीच्या उच्चाटनासाठी निसर्गपूरक उपाययोजना व पर्यावरण रक्षण या अभियानांतर्गत करण्यात येणार आहे. ३१ मार्च २०२१ अखेर  हे अभियान राबविण्यात येईल. घनकचरा व्यवस्थापन, ओल्या कचऱ्यातून गांडूळ खतनिर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे. प्लास्टिक संकलन केंद्र यापूर्वीच सुरू झाले आहे. ओढ्यामध्ये वनराई बंधाऱ्यांची उभारणी करण्यात येणार असून ओढा व तलावातील गाळ काढण्यात येणार आहे. ग्रामपंचायत कार्यालय आणि शाळांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्यात आला आहे. रेन हार्वेस्टिंग व कूपनलिका पुनर्भरणावर जोर देण्यात येणार आहे. अमृत वननिर्मिती करून वृक्षलागवड पार्क यापूर्वी तयार करण्यात आला आहे.

ग्रामपंचायतीने २०१० पासून लोकसहभागातून ग्रामविकास साधला असून राज्य व केंद्र शासनाचे विविध पुरस्कार गडमुडशिंगी ग्रामपंचायतीने मिळवले आहेत. यापुढेही लोकसहभाग असाच पुढे सुरू राहावा, असे आवाहन ग्रामपंचायतीचे प्रशासक संदेश भोईटे व ग्रामविकास अधिकारी आर. एन. गाढवे यांनी केले.