मुंबई: स्टॉक ब्रोकर्सकडून होणाऱ्या गैरव्यवहारावर आणि फसवणुकीवर नियंत्रण आणण्यासाठी आता सेबीकडून एक औपचारिक यंत्रणा निर्माण करण्यात येणार आहे. तसेच लिस्टेड कंपन्यांच्या बोर्डवर कायमस्वरूपी संचालकपद धारण करण्याची प्रथाही संपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्डाच्या (सेबी) बुधवारी झालेल्या बैठकीत या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.
बाजार नियामक सेबीने बुधवारी अनेक प्रस्तावांना मंजुरी दिली असून, त्यात सूचीबद्ध कंपन्यांच्या बोर्डावर कायमस्वरूपी संचालकपद धारण केलेल्या व्यक्तींची प्रथा संपुष्टात आणली आहे. हे पाऊल कॉर्पोरेट गव्हर्नन्स इकोसिस्टमला आणखी चालना देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे.
शेअर बाजारामध्ये स्टॉक ब्रोकर्सकडून फसवणूक झालेल्या अनेक तक्रारी सेबीकडे प्राप्त झाल्या आहेत. या स्टॉक ब्रोकर्सकडून शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहाराच्या घटनाही घडल्याचे समोर आले आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी आता सेबीने एक फ्रेमवर्क तयार करणार असल्याची घोषणा केली आहे.
इनिशियल पब्लिक ऑफरिंग्जसाठी (IPOs) केल्या जाणाऱ्या दुय्यम बाजार व्यवहारांसाठी फंड-ब्लॉकिंग सुविधा सुरू करण्याचा निर्णय सेबीने घेतला आहे. स्टॉक ब्रोकर्सकडून होणार्या गैरवापरापासून गुंतवणूकदारांच्या पैशाचे रक्षण करणे हा यामागचा उद्देश आहे.