सिंधिया यांनी कोश्यारी, त्रिवेदी यांचा निषेध करावा : मुश्रीफ

0
4

कोल्हापूर (प्रतिनिधी) : केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचा जाहीर निषेध करावा, असे आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकारद्वारे केले आहे.

मुश्रीफ यांनी म्हटले आहे की, सिंधिया हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज या घराण्यांशी ते नेहमीच आपला वारसा सांगतात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनीही अवमानकारक वक्तव्य केले आहे. ह्या दोन्हीही घटना अतिशय क्लेशदायक, वेदनादायक आणि चीड आणणाऱ्या आहेत. याबद्दल सिंधिया यांनी राज्यपाल कोश्यारी आणि भाजपाचे प्रवक्ते त्रिवेदी यांचा जाहीर निषेध करावा, अशी आमची विनंती आहे.

राजर्षी शाहू महाराजांच्या जनक घराण्याचा वारसा सांगणारे मात्र अद्यापही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या अवमानाबद्दल आपल्या भावनाच व्यक्त करीत नाहीत, याबद्दल आम्हाला कमालीचे आश्चर्यच वाटते. यापूर्वी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा अवमान केला गेला. त्यापाठोपाठ छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्याने अवमान केला जात आहे. अशा या प्रवृत्तींना जनता कधीही माफ करणार नाही, असेही मुश्रीफ यांनी म्हटले आहे.