कोल्हापूर (श्रीकांत पाटील) : अनेक महिन्यांच्या कालखंडानंतर जिल्ह्यामध्ये २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून वेगवेगळ्या स्तरावर खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. शाळांमध्ये मोजकेच तास होणार असून विद्यार्थ्यांची उपस्थिती पूर्णपणे ऐच्छिक असेल. सुरक्षित वावराबाबतच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे, हे जरी प्रशासनाने स्पष्ट केले असले, तरी शिक्षकांच्या कोरोना चाचणी वेळेत करण्यात मात्र बरीचशी ‘बेपर्वाई’ दाखविण्यात आली आहे. शाळा सुरू झाल्यानंतर कोरोनाची लागण झालेले संशयित शिक्षक उपस्थित राहिले आणि त्यांच्याकडून मुलांमध्ये त्याचा प्रसार झाला तर उद्भवणाऱ्या परिस्थितीला कसे तोंड देणार, असा सवाल पालक, विद्यार्थ्यांतून होत आहे.  

शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याचा निर्णय झाला. वास्तविक, त्यापूर्वीच जिल्ह्यातील सर्व शिक्षकांची कोरोना चाचणी व्हायला हवी होती. मात्र, आतापर्यंत 12000 माध्यमिक शिक्षकांपैकी ५ हजार शिक्षकांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. त्यापैकी दोन हजार शिक्षकांचे अहवाल प्राप्त झाले असून दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे तर इतरांचे प्रलंबित आहेत. उर्वरित तीन हजार शिक्षकांच्या स्वॅबची तपासणी मंगळवारपासून (दि. २४) होणार आहे. इतर शिक्षकांची कोरोना चाचणी टप्प्याटप्प्याने होणार आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळी यांनी दिली आहे.

शाळा सुरू होण्याच्या केवळ काही दिवस अगोदर चाचण्या अनिवार्य करण्यात आल्या असून मग त्यांचे चाचणी अहवाल अद्याप प्रलंबित का आहेत ? तसेच प्रलंबित अहवाल असणारे शिक्षक शाळेत उपस्थित राहणार की नाही, याबद्दल कोणतेही चित्र स्पष्ट नाही. एकीकडे पालकांकडून संमतीपत्र मागवून प्रशासन जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत आहे. यातच शिक्षकांच्या कोरोना चाचणीचेही कोणतेही नियोजन व्यवस्थितरित्या  केलेले दिसून येत नाही. ज्यांच्या चाचणीचा अहवाल प्रलंबित आहे ते शिक्षक जर तेवीस तारखेपासून कामावर उपस्थित राहिले आणि त्यांच्या संसर्गाने विद्यार्थ्यांसह इतरांना कोरोनाची लागण होऊ शकते, हे प्रशासनाला लक्षात कसे येत नाहीये ? विद्यार्थ्यांना लागण झाल्यास होणाऱ्या परिस्थितीला जबाबदार कोण, हा प्रश्न उपस्थित होत आहे.