मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात मुलांचे लसीकरण न झाल्याने सध्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यास टास्क फोर्सने विरोध केला आहे. त्यामुळे येत्या १७ ऑगस्टपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने मागे घेतला आहे. तसेच तिसऱ्या लाटेचा अभ्यास करुन दिवाळीनंतर शाळा सुरु करावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिल्याचे सांगितले जात आहे. 

राज्यातील शाळा १७ ऑगस्टपासून सुरु करण्याच्या निर्णयावर राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या उपस्थितीत काल उशिरा बैठक झाली. या बैठकीला टास्क फोर्सचे सदस्य, शिक्षण विभागाचे अधिकारी आणि काही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत लहान मुलांचे आरोग्य आणि शाळा सुरू करण्याबाबत चर्चा झाली. १८ वर्षांखालील मुलांचे लसीकरण झाले नसताना त्यांना शाळेत बोलवणे धोकादायक असल्याची भूमिका तज्ज्ञांनी व्यक्त केल्यानंतर बैठकीत शाळा सुरू करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला. दरम्यान, शाळा १७ ऑगस्टपासून सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी घेतला होता. आता या आदेशाला राज्य सरकारने स्थगिती दिली आहे.