कोल्हापूर (प्रतिनिधी) : येत्या सोमवारपासून नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरु करण्याच्यादृष्टीने महापालिका प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. कोरोनामुळे शहरातील ३७० शिक्षकांची तपासणी तर ६५ शाळांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. उर्वरित शिक्षकांची तपासणी आणि  शाळांचे निर्जंतुकीकरण, स्वच्छतेचे काम केले जात आहे. सोमवारपासून शहरातील ११२ शाळा सुरू होतील, अशी माहिती प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिली.

त्या म्हणाल्या, सोमवारपासून ९ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा सुरु होतील. संबंधित शाळांमधील ११९५ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचीही कोरोनाच्या अनुषंगाने आरटीपीसीआर तपासणी करण्यात येत आहे. महापालिकेच्या शहरातील ११ नागरी आरोग्य केंद्रे, आयसोलेशन हॉस्पिटलसह १२ ठिकाणी कोरोना चाचणीची मोफत सुविधा उपलब्ध केली आहे. शाळा व परिसराचे निर्जंतुकीकरण, स्वच्छतेचे कामही गतीने सुरु आहे. वर्गनिहाय पालक समितीची बैठक घेणे, शाळेच्या अंतर्गत व बाहय परिसरात किमान ६ फूट शारीरिक अंतर ठेवणे, यासाठी चौकोन अथवा वर्तुळ तयार करणे, सर्व विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी कायम मास्कचा वापर करण्याबरोबरच त्यांची दररोज ऑक्सिजन व तापाची चाचणी करणे बंधनकारक केले आहे.