मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील संपूर्ण कामकाज ठप्प होते. पण अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अनेक उद्योगधंदे हळूहळू सुरु होत आहेत. असे असले तरीही शाळा-कॉलेजेस मात्र अजूनही बंदच आहेत. राज्यातील शाळा दिवाळी नंतरच सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षा लक्षात घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

कोरोनाचा प्रादुर्भाव पाहून टप्प्या-टप्प्याने शाळेतील वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. इयत्ता नववी ते बारावीचे विद्यार्थी हे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांपेक्षा जास्त सजग असल्याने आणि त्यांचे महत्वाचे शैक्षणिक वर्ष असल्याने या वर्गांचा शाळा सुरू करताना प्रामुख्याने विचार केला जाणार आहे. त्यानंतर इतर वर्ग टप्प्याटप्प्याने सुरू होतील.

सरसकट शाळा सुरू करून विद्यार्थी आणि शिक्षकांच्या आरोग्याशी सरकार खेळणार नाही. त्यांचे आरोग्य धोक्यात घालणार नाही. ही महत्वाची भूमिका घेण्यात आली आहे. राज्य सरकारने निर्धारित केलेल्या आरोग्य विषयक सर्व सुचनांचे आणि खबरदारीचे उपाय करूनच स्थानिक पातळीवर शैक्षणिक संस्थांना शाळा सुरू करण्याची परवानगी दिली जाणार आहे.अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे लवकरच बैठक घेऊन विद्यार्थीहिताचा निर्णय घेतील, अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.