मुंबई (प्रतिनिधी) :  राज्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी बनावट नोंदणी केली जाते. यासाठी विद्यार्थी आणि शिक्षकांची उपस्थिती व्यवस्थित नोंदवली जावी म्हणून शालेय शिक्षण विभागाने महा स्टुडंट अॅप तयार केले आहे. लवकच हे अॅप राज्यातील सर्व शाळांमध्ये लागू करण्यात येणार आहे.

सध्या शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांची बायोमॅट्रिक हजेरी घेतली जाते. मात्र, इथून पुढे अचुक आणि योग्य माहिती मिळावी यासाठी महा स्टुडंट अॅपद्वारे उपस्थितीची नोंदणी केली जाणार आहे. या अॅपच्या माध्यमातून ही माहिती सतत अपडेट केली जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थितीची योग्य माहिती त्वरीत नोंदवली जाणार असून  शालेय पोषण आहार सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत आहे की नाही याची माहितीही अचूक मिळणार आहे.

या अॅपच्या माध्यमातून पारदर्शक उपस्थिती दिसणार असून यामुळे विद्यार्थ्यांच्या बनावट नोंदी, तसेच शाळामध्ये अनुपस्थित राहणाऱ्या शिक्षकांवरही चाप बसू शकतो, अशी माहिती सांगण्यात आली.