कोल्हापूर (प्रतिनिधी) : मनरेगा अंतर्गत सन २०२२-२३ चा कृती आराखडा तयार करण्यासाठी येत्या १५ दिवसांत गाव निहाय शिवारफेरी करण्यासाठीचे वेळापत्रक तयार करा. कृती आराखडे परिपूर्ण होण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी शिवार फेरीमध्ये सहभागी व्हावे. या शिवार फेरीला सरपंच, सदस्य,  ग्रामसेवक आणि इतर ग्रामस्तरीय अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या. ते आज (गुरुवार) आढावा बैठकीत बोलत होते.

जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत सन २०२२-२३ साठीचे लेबर बजेट बनवण्याचे नियोजन करावे. जिल्ह्यात रोजगार हमी योजनेंतर्गत कामे सुरु नसलेल्या 158 गावांत तात्काळ कामे सुरु करावीत. वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, रेशीम लागवड विभाग व इतर यंत्रणांनी आपल्या विभागाची कामे वेळेत सुरु होण्यासाठी नियोजन करावे. ग्रामपंचायतींमध्ये ग्रामरोजगार सेवक पद रिक्त असल्यास तात्काळ भरण्यासाठी कार्यवाही करावी, असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले.

तसेच ग्रामस्तरीय आराखडे येत्या ग्रामसभेमध्ये मंजूर होण्यासाठी तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करावा. प्रत्येक विभागाने त्यांचे मनुष्यदिवसांचे उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी रेखावार यांनी केल्या.

या बैठकीला रोजगार हमी योजना विभागाचे प्रशांत खेडेकर, ज्ञानदेव वाकुरे, चंदनशिवे, सुनील निकम, स्वप्नील मगदूम, धनाजी पाटील,  अधिकारी उपस्थित होते. तर सर्व तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, वन क्षेत्रपाल (वन विभाग व सामा. वनिकरण) हे दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले.