सयाजी शिंदे यांनी पन्हाळा नगरपरिषदेला केले ३९१ वृक्षांचे दान…

0
202

पन्हाळा (प्रतिनिधी) : छ. शिवाजी महाराजांची ३९१ वी जयंती १९ रोजी साजरी होत आहे. यानिमित्ताने त्यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या ऐतिहासिक पन्हाळगडावर सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी भारतीय प्रजातींची ३९१ झाडे पन्हाळा नगरपरिषदेस भेट दिली.

सयाजी शिंदे, आमदार विनय कोरे, माजी खासदार राजू शेट्टी, दिग्दर्शक अरविंद जगताप व सिने अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर यांनी बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वृक्षारोपण मोहिमेस सुरुवात केली. त्यानंतर माझी वसुंधरा या अभियानांतर्गत बाजीप्रभू पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज मंदिर मार्गावर वृक्ष दिंडी काढण्यात आली.

मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांनी मान्यवरांना पर्यावरण रक्षणाची हरित शपथ दिली. नगराध्यक्ष सौ. रुपाली धडेल यांनी छ. शिवाजी महाराजांची मूर्ती व रोपटे देऊन मान्यवरांचा सत्कार केला. सयाजी शिंदे यांनी वृक्षांचे महत्व अधोरेखित करून पन्हाळा शहरात दरवर्षी अशी मोहीम राबवणार असे प्रतिपादन केले. तसेच नगराध्यक्ष धडेल यांनी सर्व ३९१ वृक्षांचे पूर्ण संवर्धन करण्याचे आश्वासन दिले. यानंतर छ.शिवाजी महाराज मंदिराजवळ मान्यवरांच्या हस्ते या वृक्षांचे रोपण करण्यात आले. या मोहिमेस सह्याद्री देवराई, शिवराष्ट्र हायकर्स, केमिस्ट असोसिएशन, कम्पनी सेक्रेटरी असोसिएशन, प्रशांत साळुंखे, मदन पाटील यांचे सहकार्य लाभले.

याप्रसंगी उपनगराध्यक्ष सौ. शरयू लाड  व सर्व नगरसेवक इत्यादी उपस्थित होते.