महाविद्यालयीन तरुणांच्या गळ्याला ‘सावकारी फास…’

कोल्हापुरातील टोळीच्या मुसक्या आवळण्याची गरज

0
876

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील महाविद्यालयात शिकणाऱ्या गरजू तरुणांना अवैध मार्गाला लावणारी एक टोळी नागाळा पार्क परिसरात वावरत असून या कुख्यात टोळीबरोबर ‘अर्थपूर्ण तडजोड’ करणारी यंत्रणाही कार्यरत असल्याच्या चर्चेने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. पोलीस या टोळीच्या मुसक्या कधी आवळणार असा सवाल होत आहे. 

नागाळा पार्क परिसरातील एका महाविद्यालयाच्या आवारात कॉलेजच्या तरुणांना व्यसनाच्या आहारी लावणारी आणि अफू, गांजा, चरस यासह अमली पदार्थांची अवैध विक्री करणारी मोठी टोळीच कार्यरत असल्याचे सांगण्यात येत आहे. अल्पवयीन कॉलेजच्या तरुणांना हेरायचे, त्यांच्याशी मैत्री करायची, त्यांना पैसे पुरवायचे आणि व्यसनाला लावायचे. या व्यसनाधीन तरुणांना पैशाची चणचण भासू लागली की या टोळीशी लागेबांधे असणाऱ्या खासगी सावकाराकडून भरमसाठ व्याजाने पैसे पुरवायचे, अशी त्यांची लुबाडण्याची प्राथमिक पद्धत आहे.

ह्या टक्केवारीचे गणित हे आठवड्याचे आणि महिन्याचे असते. ही रक्कम फेडता आली नाही की संबंधित तरुणाचा मोबाईल, मोटारसायकल काढून घेणे,  त्याला मानसिक त्रास देणे, दहशत निर्माण करणे, आई-वडिलांना याबाबात सांगण्याची धमकी किंवा इमोशनल ब्लॅकमेल करून पैशाचा तगादा लावला जातो. या गोष्टी पालकांना समजून देखील कोणीही पोलीस ठाण्यात प्रतिष्ठेपायी तक्रार करत नाहीत. असाच एक प्रकार कोल्हापुरात घडला आहे.

अमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या एका तरुणाच्या पित्याने पोलीस ठाण्यामध्ये अर्ज करूनही त्याची अजिबातच दाखल घेण्यात आली नाही. उलट यामधील एक पोलीस महाशय बाहेर ‘तडजोड’ करून या असा सल्ला देत होते. यामुळे काही पोलीस या टोळक्याचे सल्लागार आहेत का ? असा प्रश्न पडतो. पण ‘माझ्या मुलासारखी शेकडो मुले व्यसनाधीन होऊन त्यांचे जीवन उद्ध्वस्त होऊ नयेत’ या हेतूने पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद केला. या टोळीची दहशत इतकी आहे की, एक तरुण आता पुणे येथील मनोरुग्णालयात उपचार घेत आहे.

अफू, गांजा, चरस, ड्रग्ज विक्रीची ठिकाणे

कोल्हापुरात एका पेट्रोल पंपापासून जवळ असणाऱ्या प्रसिद्ध अशा न्यूरो सर्जन दवाखान्याच्या परिसरात, पंचगंगा घाटावर, महावीर महाविद्यालयापासून जवळ असणाऱ्या एका लौंड्रीजवळ, मुक्त सैनिक येथील रोडवर असणाऱ्या एका हॉटेलच्या मागे, मिरजकर तिकटी परिसर, कदमवाडी येथील एका हॉस्पिटलच्या मागे असणाऱ्या टपरीवर अमली पदार्थांची राजरोस विक्री केली जाते असे समजते. संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर उलाढाल होते.  फोनवर ऑर्डरनुसारसुद्धा पुरवठा केला जातो.

खरंतर तरुणांचे जीवन अशा प्रकारे उद्ध्वस्त करणाऱ्या टोळक्याचा कायमचा बीमोड करायला हवा. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या कारकिर्दीत अशा धंद्यांना आळा बसला होता. पण देशमुख गेल्यापासून कोल्हापुरात परत एकदा गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात डोकं वर काढत असल्याचे दिसून येते. तसं पाहिले तर याची पाळेमुळे पोलिसांना माहीत असूनही याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अवैध धंद्यामध्ये वाढ होत आहे. अशा प्रवृत्तीला वेळीच आवर घातला नाही तर अनेक तरुण व्यसनाधीन होऊन आई-वडिलांच्या स्वप्नांची राखरांगोळी होईल.