मुंबई (प्रतिनिधी) : क्रांतीज्योती सावित्रिबाई फुले यांचा जन्मदिन आता ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याला मंजुरी दिली आहे, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी ट्विटद्वारे दिली.

ते म्हणाले, ‘महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपले संपूर्ण जीवन वेचले आहे. स्त्रियांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम फुले दाम्पत्यांने केले. त्यामुळे सावित्रीबाई फुले यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा जन्मदिन हा ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री यांच्याकडे केली. मुख्यमंत्र्यांनी हे निवेदन स्वीकारत मागणीही मान्य केली.’  त्याचबरोबर हा दिवस देशभरात ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून साजरा केला जावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने केंद्र सरकारकडे मागणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.