गडहिंग्लज (प्रतिनिधी) : ते आपले क्षेत्र नव्हे म्हणून बाजूला न होता आलेल्या संधीचे सोने करीत मोठया धाडसाने केंद्रीय पोलीस दल तथा सीआरपीएफ हे क्षेत्र निवडले व त्याचे यशस्वी ट्रेनिंग पूर्ण केल्याबद्दल तेरणी (ता. गडहिंग्लज) येथील सुकन्या सविता कल्लापा नाईक हिचा संगमेश्वर विकास सेवा संस्था व बसवेश्वर दूध संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

तेरणीचे शेतकरी अरुणराव देसाई म्हणाले, सविता नाईक हिने चिकाटीने सीआरपीएफचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. तिच्याकडून देश सेवेचे सर्वोत्तम कार्य घडावे, अशी अपेक्षा आहे. तेरणीतील तबसुम छडेदार हिने युवा कार्यक्रम आणि खेल मंत्रालय, राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत क्षेत्रीय निदेशालय दिल्ली येथील राष्ट्रीय एकता शिबिरात शिवराज कॉलेजच्या एन.एस.एस विभागातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. बसवेश्वर दूध संस्थेच्या वतीने शकुंतला गिडचिणी यांच्या हस्ते आणि संगमेश्वर विकास सेवा संस्थेमार्फत वैशाली सुतार यांच्या हस्ते तबसुमचा सत्कार करण्यात आला.

सत्कार मूर्तींनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. बसवेश्वर दूध संस्थेचे व्हा. चेअरमन संजय जोशी, मंगल इंगवले, शंकर निंबाळकर, मलाप्पा भंगारी, केंपया पट्टदेवरू, शंकर ढब, अशोक मगदूम, अण्णाप्पा नाईक, दूध संस्थेचे सचिव करवीर नावलगी, संगमेश्वर विकास संस्थचे चेअरमन आण्णासाहेब देसाई, उपाध्यक्ष बसवंत फडके, इरापा चौगुले, नागेश देसाई, बापू जमादार, शिवाजी नाईक आदी उपस्थित होते.