कागल  (प्रतिनिधी) : येथील शाहू ग्रुप व पुण्याच्या दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज (डिक्की) यांच्या संयुक्त विद्यमाने दलित समाजातील उद्योजक व व्यावसायिक तरुणांसाठी शनिवारी (दि.१३)  बामणी (ता. कागल) येथे मार्गदर्शनपर कार्यशाळा होणार असल्याची  माहिती शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

या मेळाव्यास दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे संस्थापक पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे मार्गदर्शन करणार असून यावेळी उद्योजकांच्या शंकांचे निरसनही ते सविस्तरपणे करणार आहेत.

दलित समाजातील युवकांनी व्यवसाय व उद्योगाकडे वळावे. पर्यायाने दलित बांधव स्वावलंबी बनावेत. या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन केले असून राष्ट्रीयीकृत बँकांचे व जिल्हा उद्योग केंद्राचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेत अनेक तज्ज्ञांमार्फत नवनवीन व्यवसायांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळणार आहे.  कार्यशाळेत भाग घेणाऱ्या दलित उद्योजकांची  नोंदणी डिक्की  पुणे मार्फत करण्यात येणार आहे.

कागल – निढोरी राज्यमार्गावरील आर. के मंगल कार्यालय बामणी येथे दुपारी ११ वाजता हा मेळावा होणार असून जास्तीत जास्त दलित समाजातील युवकांनी या मेळाव्यास उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन घाटगे यांनी  केले आहे.