धामोड (सतीश जाधव) : राधानगरी तालुक्यातील कोनोलीपैकी कुपलेवाडी येथे वसंत लहू कुपले या शेतकऱ्याच्या घराच्या मागील डोंगरावर बावीस जुलैच्या रात्री साडेबारा वाजता भूस्खलन होवून डोंगर खचून घरावर सरकल्याने वसंत लहू कुपले आणि त्यांच्या पत्नी सुसाबाई वसंत कुपले हे दांपत्य झोपलेल्या ठीकाणीच मातीच्या भराव्याखाली गाडले गेले. त्यातच त्यांचा म्रुत्यु झाला. त्यांचा मुलगा सतिश लहू कुपले बाहेरगावी असल्याने वाचला. आई-वडीलांच्या पासून पोरका झाला.

या घटनेनंतर सतिशला आधार देण्यासाठी परीसरातील नागरीकांनी तसेच राधानगरी तालुका आणि जिल्हा पातळीवरील राजकीय नेत्यांनी कुपलेवाडी गावात भेट देऊन आधार दिला. काहींनी थोडीफार मदत केली असली तरी बऱ्याचजणांनी पाठीवर हात ठेवून जगण्याच्या नव्या उमेदीचे शब्द बोलून सांत्वन केले. पण पाठीवरती हात ठेवून लढ म्हणण्याबरोबरच सतीशला यावेळी खरी गरज आहे ती आर्थिक मदतीची.

याबरोबरच ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद,  आमदार, खासदार या परीसराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व लोक प्रतिनिधींनी विशेष लक्ष घालून शासकीय स्तरावरील सर्व मदत लवकरात लवकर उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. शिवाय सामाजिक संस्था आणि ट्रस्ट यांनी पुढे येवून मदतीचा एक हात पुढे करणे आवश्यक आहे. तरच एका निराधाराला आधार मिळून जगण्याची एक नवी उमेद येईल.