इचलकरंजी (प्रतिनिधी) : थकबाकीपोटी महावितरणकडून वीज कनेक्शन तोडण्याचे काम सुरू आहे. वीज ग्राहकांना थकीत बिलाचे हप्ते करून द्यावेत, त्यांचे वीज कनेक्शन तोडू नये, अशी मागणी आज (सोमवार) सतेज पाटील फॅन्स सतेज फायटरच्या शिष्टमंडळाने इचलकरंजी महावितरणचे कार्यकारी अभियंता सोमाण्णा कोळी यांचेकडे निवेदनाद्वारे केली. वीज कनेक्शन तोडण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांनी दंडुकशाही दाखविण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसे उत्तर देऊ, असा इशाराही देण्यात आला.

निवेदनात म्हटले आहे की, इचलकरंजीतील प्रभाग क्र. २२ मध्ये आयजीएम परिसर, गोसावी गल्ली, गोंधळी गल्ली, गोकुळ चौक, नारळ चौक, ज्ञानेश्वर गल्ली परिसरात कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. वीज बीलाची ३२ टक्के रक्कम व उर्वरीत रक्कम हप्त्या हप्त्याने भरण्याची मुभा आहे. त्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दंडुकशाही पध्दतीने गोरगरीब वीज ग्राहकांचे कनेक्शन तोडू नये. अन्यथा जशास तसे उत्तर देऊ.

या वेळी संतोष कांदेकर, अरुण वासुदेव, महादेव घट्टे, अनिल भुत्ते, अतुल नवनाळे, दिनेश नाडकर, शेखर शिंदे, मनोज कमलाकर, सीताराम रवंदे यांच्यासह सदस्य उपस्थित होते.