कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिरोली पुलाची येथील तलाठी कार्यालयात दस्त नोंदीची प्रकरणे जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवली जातात. चुकीच्या पद्धतीने नोंदी रद्द करून ग्रामस्थांची अडवणूक केली जाते. याबरोबरच भरमसाठ पैशाची मागणी केली जाते. याच्या निषेधार्थ आज (शुक्रवार) तलाठी निलेश चौगुले आणि मंडळ अधिकारी श्रीमती कारंडे यांना सरपंच शशिकांत खवरे यांच्यासह ग्रामस्थांनी धारेवर धरत तलाठी कार्यालयाला टाळे ठोकले. यावेळी काही नागरिकांनी तलाठी कार्यालयातून पैशांची मागणी केल्याची जाहीरपणे सांगितल्याने तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली.

शिरोली येथील तलाठी कार्यालयात मिळकतीच्या दस्त नोंदीची प्रकरणे गेली दोन वर्षे जाणीवपूर्वक रखडवली आहेत. यासाठी भरमसाठ पैशाची मागणी केली जाते. चार महिन्यापूर्वी बदलून आलेल्या मंडळ अधिकारी श्रीमती कारंडे यांनी तुकडा बंदीच्या कायद्याचे कारण पुढे करून अनेक नोंदी रद्द केल्या. यामुळे संबंधित नागरिक संतप्त झाले.  त्यांनी सरपंच शशिकांत खवरे यांचेकडे तक्रार केली. सरपंच खवरे यांनी दोन दिवसांपूर्वी तलाठी निलेश चौगुले यांना जाब विचारला तेव्हा त्यांनी मंडल कार्यातून नोंदी रद्द केल्याचे सांगून आपली बाजू काढून घेतली.

आज मंडलाधिकारी कारंडे आणि चौगुले यांना शिरोलीत बोलावून याबाबत जाब विचारला. यामुळे काही काळ वातावरण तंग बनले. प्रलंबित प्रकरणे आणि रद्द झालेली प्रकरणे नोंद करण्याबाबत ठोस आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे सरपंच शशिकांत खवरे यांनी सांगितले.

यावेळी उपसरपंच सुरेश यादव, तंटामुक्त समिती अध्यक्ष सतीश पाटील, प्रल्हाद खवरे, दीपक रानमाळे, दीपक खवरे, ज्योतीराम पोर्लेकर, अशोक खोत, बाजीराव सातपुते, उत्तम पाटील, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.