कोल्हापूर (प्रतिनिधी) : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आठ ग्रामपंचायतींच्या सरपंच आरक्षणप्रश्नी सुनावणी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी घेतली. त्याचा निकाल १६ फेब्रुवारीला देण्यात येणार आहे. या निकालाकडे संबंधित ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.

करवीर तालुक्यातील कोगे, खुपिरे आणि शिरोळ तालुक्यातील फणसवाडी, शाहूवाडी तालुक्यातील गिरगाव, गडहिंग्लज तालुक्यातील तळेवाडी या आठ गावातील सरपंच आरक्षणप्रश्नी सुनावणी झाली. या गावांनी सरपंच आरक्षण चुकीच्या पध्दतीने काढण्याचा आरोप करीत उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

याप्रकरणात न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी त्यांच्या दालनात सुनावणी पार पडली. सुनावणीस याचिकाकर्ते, ग्रामपंचायत सदस्य, तहसीलदार ग्रामसेवक उपस्थित होते. यावर १६ फेब्रुवारीपर्यंत निकाल देण्यात येणार आहे. त्यानंतर या आठ ग्रामपंचायतींसह सहा तालुक्यातील २५९ ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच निवडीचा कार्यक्रम निश्चित केला जाणार आहे.