Published June 3, 2023

कोल्हापूर : मोरेवाडीसह १३ गावांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी ३४४ कोटींची जलजीवन मिशन योजना लवकरच कार्यान्वित होईल. पाणी प्रश्न निकाली काढण्यासाठी १३ गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांचा समावेश असणारी शिखर समिती नेमण्यात येईल, अशी ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली.

आर. के. नगर को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी क्रमांक ५ येथे  पाणीप्रश्नी आयोजित बैठकीत ते बोलत होते. येत्या १० जून रोजी बैठक घेऊन १३ गावांच्या पाण्याचे नियोजन केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

करवीर तालुक्यातील मोरेवाडी, आर. के. नगर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी नानासाहेब माने सांस्कृतिक भवनमध्ये बैठक घेण्यात आली.

सुनीलराव शिंदे यांनी प्रास्ताविक केले. मोरेवाडीचे सरपंच ए. व्ही. कांबळे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. डॉ. संजीव उपाध्ये, विश्वासराव साबळे, आशीष पाटील, अॅड. शिल्पा सुतार, लतिका कोरवी, अविराज पाटील महिला आणि नागरिकांनी पाणी टंचाईबाबत तीव्र भावना व्यक्त केल्या.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडील अनेक अनुभवी अधिकारी आणि कर्मचारी सध्या सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना मानधन तत्त्वावर पुन्हा घेऊन जलजीवन मिशन योजना पूर्णत्वास नेली जाईल, असे जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता अमित पाथरवट यांनी सांगितले. मोरेवाडी आणि आर. के. नगर परिसरातील पाईपलाईनची सर्व गळती आठ दिवसांत काढली जाईल, कामाची पूर्तता न करणाऱ्या ठेकेदारांना नोटीस देऊन ठेका रद्द करण्याबरोबरच नव्या ठेकेदाराला या कामाचा ठेका दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.

मोरेवाडी, पाचगाव, कळंबा, गांधीनगरसह, १३ गावांसाठी पिण्याच्या पाण्याची योजना १९९७ साली मंजूर झाली होती. त्यावेळी २०११ च्या लोकसंख्येच्या आधारे या योजनेचा आराखडा तयार करण्यात आला होता. वाढत्या लोकसंख्येचा विचार करून, आमदार सतेज पाटील आणि आपण या १३ गावांसाठी पुढील 30 वर्षांचे नियोजन करून सुधारित गांधीनगर नळ पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. या १३ गावांतील प्रत्येक घरापर्यंत पाणीपुरवठा करण्याचे नियोजन असल्याचे आ. ऋतुराज पाटील यांनी सांगितले.

मोरेवाडी आणि आर. के. नगर परिसरातील पाण्याच्या पाईपलाईनची गळती काढली पाहिजे, तसेच पाणीपुरवठा सुरळित करण्यासाठी योग्य नियोजन करावे, याबाबत शिखर समिती नेमावी, अशा सूचना आ. ऋतुराज पाटील यांनी जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता अमित पाथरवट आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दिल्या.

आमदार ऋतुराज पाटील, मोरेवाडीचे सरपंच ए. व्ही. कांबळे आणि उपसरपंच दत्तात्रय भिलुगडे यांचा वाढदिवस एकत्रितपणे सर्व नागरिकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी राजाराम भिलुगडे, प्रकाश मोरे, ग्रा. पं. सदस्य अमर मोरे, उज्ज्वला हुन्नुरे, सिद्धी कारंडे, सुदर्शन पाटील, मारुती सूर्यवंशी, ऋषीकेश हुन्नुरे, दत्ता मोरे, सुजाता पाटील, बापू गायकवाड, विजय पाटील आदी उपस्थित होते.

September 23, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023