शिरोळ (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंचाच्या निवडीसाठी ९ फेब्रुवारीरोजी विशेष सभा होणार होती. परंतु, आता १६ फेब्रुवारीपर्यंत विशेष सभा स्थगित ठेवण्याच्या सूचना उच्च न्यायालयाने जिल्हाधिकारी कार्यालयाला दिल्या  आहेत.

तालुक्यातील शिरटी आणि मजरेवाडी या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आरक्षणा बाबत उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या तालुक्यामध्ये रिट याचिका दाखल झाली आहे. त्या तालुक्यातील सरपंच व उपसरपंच निवडी १६ फेब्रुवारीपर्यंत स्थगित ठेवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्थगित केलेल्या विशेष सभेची तारीख नंतर कळवण्यात येणार आहे. याबाबतचे पत्र शिरोळच्या तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ यांनी संबंधित ग्रामपंचायतींना पाठविले आहे.